: योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा
अंबाजोगाई : कोरोना झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवेपेक्षा मानसिक आधाराची मोठी गरज आहे. रोगाची मोठी धास्ती रुग्ण घेत असल्याने त्याचा विपरित परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे. यासाठी कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची मोठी गरज आहे. यासाठी सकारात्मक विचारसरणी जोपासावी, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले आहे.
अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयातील कोविड कक्षामध्ये गेल्या वर्षभरात चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. आता कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढतच चालली आहे. ही वाढती रुग्णसंख्या व वाढत चाललेला प्रादुर्भाव याची मोठी धास्ती नागरिकांच्या मनात बसली आहे. कोरोना हा साथीचा आजार असला तरी, तो पूर्णपणे बरा होतो. कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा लक्षणे आढळून आल्यास घरात बसू नका. तात्काळ डॉक्टरांना दाखवा व लवकर उपचार सुरू करा. कोरोनाच्या रुग्णांना औषधोपचारापेक्षा मानसिक आधाराची मोठी गरज आहे. रुग्ण नकारात्मक विचारसरणीने धास्तावतो व त्याचा विपरित परिणाम त्याच्या आजारावर होतो. त्यामुळे अनाठायी भीती बाळगण्याची गरज नाही. भीतीने शरीरातील सकारात्मकता कमी होते. त्यामुळे व्याधींना आमंत्रण मिळते. कोरोना होऊच नये यासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचा वापर करा. चांगली जीवनशैली अंगिकारा, नियमांचे काटेकोरपणे पालन करा. यामुळे तुम्ही कोरोनाला दूर ठेवण्यास नक्की यशस्वी व्हाल, असेही डॉ. बिराजदार म्हणाले.