बीड : सध्या कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी सर्वच लोक कोरोना लस घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु, जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ नियोजनाचा सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे लसीकरणाची नोंदणी करण्यासह रांगा लावण्यासाठी मनुष्यबळच नाही. त्यामुळे झुंबड उडत आहे. आपल्या अपयशाचा राग पोलीस आणि प्रशासन सामान्यांवर काढत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरण करून घ्यावे म्हणून आरोग्य विभाग व शासन आवाहन करीत आहे. सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात आली. त्यावेळी लसीचा साठाही मुबलक होता. आता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जात आहे. परंतु, साठाच पुरेसा उपलब्ध नाही. आहे ते डोस घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच केंद्रावर रांगा लावत आहेत. परंतु, केंद्रावर पोलीस अथवा आरोग्य विभागाचे कसलेच नियोजन नाही. वेळ घेऊन आल्यानंतरही खात्री करण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी असल्याने लाभार्थ्यांच्या रांगा लांबच लांब लागत आहेत. त्यामुळे गर्दी झाल्याचे दिसते.
दरम्यान, ही गर्दी होऊ नये, तसेच झुंबड उडू नये, यासाठी येथे अगोदरच पुरेसा पोलीस बंदोबस्त अथवा आरोग्य विभागाने कर्मचारी नियुक्त करणे गरजेेचे होते. परंतु, बुधवारी सकाळी अचानक पोलिसांचा ताफा आला आणि गर्दी केल्याचे पाहताच लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यात तीन ते चार तरुण जखमीही झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सामान्यांचा धक्का लागला होता. यात सामान्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी मात्र यावर नाराजी व्यक्त करीत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला.
कडक लॉकडाऊन, मग लसीकरणाला जायचे कसे?
एकीकडे प्रशासन लसीकरण करून घ्या म्हणून आवाहन करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला कडक लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर आलेल्या लोकांना मारहाण केली जात आहे. बुधवारीही जालना रोडवर लसीकरणाला जाणाऱ्या लोकांना पोलिसांनी मारहाण केली. लॉकडाऊनमध्ये लोकांनी बाहेर निघायचे नाही तर मग लसीकरण करायचे कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून प्रशासन आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्यांना सहन करावा लागत असून, संताप व्यक्त होत आहे.
ज्येष्ठांना धक्का लागल्याने त्रास
बुधवारी पोलिसांनी अचानक येऊन लाठीचार्ज केला. यावेळी येथे काही ज्येष्ठ नागरिकही होते. तरुणांना मारहाण करताना पोलिसांचा धक्का काही ज्येष्ठांनाही लागला. यात ते खाली पडले. त्यांना कोणी आधार देण्याची तसदीही घेतली नाही. पोलिसांच्या अचानक येण्याचा त्रास ज्येष्ठांसह महिलांनाही झाला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कोट
बाहेर काय धिंगाणा झाला माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल. लसीकरणासाठी नियोजन केलेले आहे.
डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्य चिकित्सक बीड
===Photopath===
050521\05_2_bed_25_05052021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लसीकरणासाठी झालेली गर्दी. केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना असे ताटकळत उभा रहावे लागले होते.