बीड : जिल्ह्यात सध्या सोशल डिस्टन्स न ठेवणारे आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. या कारवाया पालिका, नगरपंचायतीकडून केल्या जातात. परंतु शुक्रवारी चक्क याच खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले होते. यावरून नेत्यांसाठी वेगळे आणि सामान्यांसाठी वेगळे नियम का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड तालुक्यातील आंथरवण पिंपरी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सुरू केलेल्या ५०० खाटांच्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी बीडमध्ये आले होते. त्यांच्यासमवेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी मंत्री सुरेश नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नागरिकांनी घरातच बसून लॉकडाऊनचे पालन करण्याबाबत आवाहन केले जाते. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, असेही ते सांगतात. परंतु त्यांच्याच पक्षातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांकडून या सर्वांचे उल्लंघन केले जात आहे. मंत्र्यांचा ताफा सेंटरमध्ये आल्यापासून ते जाईपर्यंत सर्वत्र गर्दीच पाहावयास मिळाली. शासन आणि आरोग्य विभागाकडून जे कोरोना नियम सांगितले जातात, त्याचे पूर्णपणे येथे उल्लंघन झाल्याचे दिसले. नियम आणि कारवाई केवळ सामान्यांसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मास्क नसल्यास मारहाण; जिल्हाप्रमुखच मास्कविना
बीड शहरात सध्या मास्क नसणाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. यात अनेकांना जखमा झाल्या आहेत. ५०० रुपये दंडही वसूल केला जातो. या कारवाया पोलीस आणि नगरपालिकेने केलेल्या आहेत. परंतु या कार्यक्रमात खुद्द कार्यक्रमाचे आयोजक कुंडलिक खांडे यांनी मास्क तोंडावर न लावता हनुवटीवर ठेवला होता. तसेच त्यांच्या बाजूलाच असलेल्या दोन नेत्यांनीही मास्क लावलाच नव्हता. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही काही वेळासाठी मास्क खाली घेतला होता. सामान्यांना दंडुक्यांचा प्रसाद देणारे पोलीसही येथे उपस्थित होते आणि दंड वसूल करणारे पालिका अधिकारीही. परंतु सगळे ‘हाताची घडी, ताेंडावर मास्क’ लावून बघ्याची भूमिका घेत होते.
फोटोसेशन करण्यासाठी मास्क काढले
मंत्री शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी काहींना फोटाे काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मास्क काढून बिनधास्त फोटोसेशन केल्याचे दिसले.
..
===Photopath===
070521\07_2_bed_9_07052021_14.jpeg
===Caption===
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंथरवन पिंपरी येथील कार्यक्रमात जमलेली गर्दी. याच गर्दीत अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते.