लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : दरवर्षी १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. शाळेची पहिली घंटा याच दिवशी वाजते. गतवर्षी कोरोनाचे संकट असल्याने शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ जूनला शाळा ऑनलाइनच भरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा नोव्हेंबरमध्ये, तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा जानेवारीमध्ये सुरू झाल्या होत्या. के. जी. ते चौथीपर्यंत ऑनलाईन अध्यापन सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असून, संक्रमण झपाट्याने होत आहे. त्यामुळे यावर्षीही शाळांचे अध्यापन ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.
शासनाकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली असली तरी पाच टप्प्यांत अनलॉक होणार आहे. मात्र मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही.
कोरोनामुळे अनेक शाळांमध्ये विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी 'शाळा प्रवेशोत्सव' ही संकल्पना राबविण्यात येते. यानिमित्त शाळांची सजावट करण्यात येते. प्रभातफेरी, विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण, आदी उपक्रम राबविण्यात येतात. मात्र पावसामुळे प्रवेशोत्सवासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, यासाठी शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा विविध संकल्पना राबविल्या जातात. मात्र, या वर्षीही शाळा सुरू करण्याचा प्रत्यक्ष निर्णय नसल्यामुळे तोपर्यंत प्रवेशोत्सव अशक्य आहे. ऑनलाईनबाबतही अजून अंतिम घोषणा नाही.