लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि बीडसह राज्यात सर्वत्र रस्त्यावर धावणाऱ्या बसेस बंद केल्या. गत काही महिन्यांपासून कोरोनाचे नियम पाळून बसेस धावू लागल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आलेल्या नाहीत. बीड विभागातील जवळपास ६५ बसेस अद्याप जागेवर आहेत. याचा फटका रापमला बसत आहे. जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान रापमला सहन करावे लागत आहे. असे असले तरी सर्व बसेस हळूहळू सुरू करण्यासाठी रापमकडून प्रयत्न सुरू असल्याचे विभागीय नियंत्रक बी. एस. जगनोर म्हणाले.
१० लाखांनी उत्पन्न घटले
बसफेऱ्या कमी होत असल्याने याचा फटका उत्पन्नालाही बसला आहे. पूर्वी दररोज किमान ५२ लाख रुपये उत्पन्न येत होते. आता ते १०ने घटून ४२ लाखांवर आल्याचे सांगण्यात आले.
'लोकमत'च्या वृत्ताची दखल
शाळा सुरू होऊनही बसेस बंद असल्याने 'लोकमत'ने 'शाळा सुरू झाल्या, मात्र पोहोचायला बसच नाहीत, असे वृत्त २ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. यावर बस सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्ववत होत आहे. जवळपास ९० टक्के बसेस धावत आहेत. यापुढेही मागणी येईल, तशा बसेस सोडल्या जात आहेत. तशा सूचनाही आगारप्रमुखांना दिलेल्या आहेत. प्रवाशांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे.
- बी. एस. जगनोर
विभागीय नियंत्रक
बस बंद असल्याने हाल होत आहेत. सामान्य प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात आर्थिक लूटही होते, शिवाय सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे सर्व बसेस लवकर सुरू करून हाल थांबविणे गरजेचे आहे.
- राजेश चाळक, प्रवासी
ग्रामीण भागातील सर्व बसेस सुरू करण्यासाठी रापमला पत्र दिलेले आहे. त्यांनीही मागणीप्रमाणे बसेस सोडत असल्याचे सांगितले. परंतु यात लवकर सर्वच बसेस सुरू करून प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी आहे.
- राहुल वाईकर, संभाजी ब्रिगेड