बीड : ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळतील, त्या गावातील १०० टक्के नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी तसेच कोणत्याही गावात एकही रुग्ण किंवा गावात, घरात गृहविलगीकरण राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व पॉझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरमध्येच असणे आवश्यक असल्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना आदेशाद्वारे दिल्या आहेत. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामीण भागात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी सजग राहण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या आहेत.
सर्व गावांमध्ये ग्राम दक्षता समित्यांवर जबाबदारी सोपवून गावात कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी सर्व नागरिकांकडून करून घ्यावी. रुग्ण असलेल्या गावात ग्रामसेवकाने मुख्यालयी राहून आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करून घ्यावे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांची कोरोनाविषयक तपासणी करून संदर्भीय उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कळवावे. सर्व गावांत कोरोना प्रतिबंधात्मक भरारी पथकांची निर्मिती करून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता लग्न सोहळ्यांवरही नजर
तालुक्यातील सर्व गावांमध्ये ३० ऑगस्टपर्यंत संभाव्य लग्न समारंभाची माहिती घ्यावी. गावाचे नाव, लग्न असलेल्या घरातील कुटुंब प्रमुखाचे नाव, लग्नाची तारीख व ठिकाण आदी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दोन दिवसांंत सादर करावी, असे कळविण्यात आले आहे. या लग्न समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचेही निर्देश दिले आहेत. लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन उपस्थितीबाबत खात्री स्वतः सरपंच व ग्रामसेवकांनी करावी. नमूद संख्येपेक्षा जास्त उपस्थिती दिसून आल्यास संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.