खाजगी रुग्णालयात वेबसाइट न चालल्याने लससाठीची दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणी रखडली होती. त्यामुळे एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी दुपारपर्यंत कोरोना लस देता आली नाही. दुपारी ४ वाजेनंतर वेबसाइट सुरू झाली. आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारपासून ६० वर्षांनंतरच्या व्यक्तींना लस देण्यास येथील उपजिल्हा रुग्णालयमध्ये प्रारंभ करण्यात आला आहे. येथे सोमवारी १३१ लोकांनी कोरोनाची लस घेतली, तर मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत ८० लोकांनी लस घेतली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा व ४५ वर्षांवरील मधुमेह, रक्तदाब असलेल्या लोकांनी लस घेतली आहे. दोन दिवसांत ज्येष्ठ नागरिकांचा या लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. लोक स्वतःहून आता कोरोनाची लस घेऊ लागले आहेत. पहिल्या टप्प्यात जानेवारीमध्ये परळी उपजिल्हा रुग्णालयातील हेल्थ केअर वर्कर्स व नगर परिषद, पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देणे सुरू केले आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत २०० जणांनी कोरोना लस घेतली आहे, अशी माहिती परळी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षद शेख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी दिली. शहरातील डॉ. सूर्यकांत मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमानुसार कोरोना लस दिली जाणार आहे; परंतु मंगळवारी सर्व्हर डाऊन असल्याने नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे दुपारपर्यंत लस देता आली नाही. मात्र, दुपारनंतर वेबसाइट सुरू झाली, अशी माहिती डॉ. सूर्यकांत मुंडे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे. सरकारचे मनापासून धन्यवाद. कोविड लस घेतल्यानंतर कसलाही त्रास नाही. ही लस सुरक्षित असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेऊन कोविड रोगापासून स्वतःचे संरक्षण करावे.
-शंकरअप्पा मोगरकर, सेवानिवृत शिक्षक, परळी,
येथील कराड हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारनंतर पंधरा जणांना कोरोना लस देण्यात आली, अशी माहिती डॉ. शालिनी कराड यांनी दिली. वेबसाइट न चालल्याने दुपारपर्यंत नोंदणी झाली नव्हती. त्यामुळे व्यत्यय आला होता, असे कराड यांनी सांगितले.