पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यात मागील चार महिन्यांत २२ हजार नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे; तर त्यांपैकी आता केवळ एक हजार नागरिक दुसऱ्या लसीपासून वंचित आहेत.
माजलगाव तालुक्यात जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱी व डॉक्टर व त्यांच्या स्टाफने कोरोना लस घेतली होती. सुरुवातीला ही लस घेण्यास आरोग्य विभागाचे कर्मचारीदेखील धजावत नव्हते. त्यामुळे अनेक दिवस यांनाच लस द्यायला लागले. मार्च महिन्यात सुरुवातीस ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देणे सुरू केले व या नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देणे सुरू केले. नंतरही नागरिकांतून उत्साह दिसत नव्हता.
ज्या नागरिकांनी लस घेतली आहे, अशांना कोरोनाची लागण होत नाही व लागण झाली तरी त्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लावण्याची गरज पडत नसल्याचे वृत्त पसरल्याने नागरिकांमधून एप्रिलनंतर लस घेण्यास रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. येथील ग्रामीण भागात उशिराने लस देण्यास सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील नागरिकांत लस घेण्यास अद्यापही निरुत्साह दिसून येत आहे. माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णांलयात एप्रिल महिन्यात लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने व ग्रामीण भागातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत गर्दी नसल्याने शहरातील नागरिकांनी ग्रामीण भागात जाऊन लस घेतली. या प्रकारे शहरातील ६० ते ७० टक्के नागरिकांनी ग्रामीण भागात जाऊन लस घेतली.
माजलगाव शहर व तालुक्यासाठी आतापर्यंत २२ हजार २१८ इतक्या नागरिकांनी लस घेतली. त्यात १० हजार २८३ नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात आली. त्यात कोविशिल्ड १९ हजार ८० तर कोव्हॅक्सिन ही लस तीन हजार १०२ नागरिकांनी घेतली. यापैकी कोविशिल्डचा दुसरा डोस घेणारांची संख्या ९२५ राहिली असून, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणारे केवळ १२५ नागरिक बाकी आहेत.
-----
पहिला डोस पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला असून, दुसऱ्या डोससाठी केवळ एक हजार नागरिक राहिले आहेत. ज्या नागरिकांनी दुसरी लस घ्यायची बाकी आहे, त्यांना आम्ही फोन लावून लस घेण्यास बोलावत आहोत. तरी ज्या नागरिकांची दुसऱी लस घेणे बाकी आहे, अशा सर्वांनी तत्काळ लस घ्यावी.
-डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्याधिकारी, माजलगाव