बीड : अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस बुधवारी बीडमध्ये आल्यानंतर गुरूवारी लगेच लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात आली. तत्पूर्वी वाहनाची पुजा करून आरोग्य विभागाने टाळ्या वाजवून वाहनाला केंद्राच्या दिशेने निरोप दिला. आरोग्य विभागाने हा एक सोहळा बनविला.
कोरोना लढ्यात सर्वात पुढे होऊन काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ६०९ लोकांनी नोंदणी केली आहे. यासाठी पहिल्या टप्यात बीडला १७ हजार ६४० डोस प्राप्त झाले आहेत. यात प्रत्येकाला दोन डोस दिले जाणार असून यात ८ हजार ८२० सेवकांना प्रथम लस दिली जाईल. बुधवारी लस मिळाल्यानंतर गुरूवारी दुपारी ती एका वातानुकूलीत वाहनातून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पाठविण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी नारळ फाेडले. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवित लसीच्या वाहनाला निरोप दिला. यावेळी नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.सचिन शेकडे, डॉ.घुबडे, डॉ.अशोक गवळी, डॉ.संतोष गुंजकर, डॉ.पी.के.पिंगळे, हातवटे, बागलाने आदींची उपस्थिती होती.
केज लसीकरण केंद्र वगळले
आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार आगोदर १४ केंद्र तयार केले होते. त्यात पुन्हा कमी होऊन ते ९ झाले. बुधवारी ती संख्या सहा वर आली होती. आता गुरूवारी आणखी केजला वगळून पाचवर आली आहे. आता बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, परळी या पाच ठिकाणी नियोजन केले आहे. शनिवारपर्यंत अद्यापही निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.