अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना होत असल्याने स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्याने प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे की प्रसार करायचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दिवसागणिक हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी दुपारी चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मृत रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का असा सवाल केला जात आहे.
एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णांची आणि मृतदेहांचीही वाहतूकजिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक केली जाते तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशा प्रकारांनी कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येत आहे.
वाढीव रुग्णवाहिकांची मागणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रूग्णवाहिका देण्यात आल्या होत्या, सध्या दोन आहेत. वाढीव रूग्णवाहिकांसाठी आम्ही १७ मार्चरोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे, परंतु अद्याप रूग्णवाहिका मिळाल्या नाहीत. रूग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालिन स्थितीत रूग्णांची ने-आण करण्यासाठी या रूग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो. सॅनिटायजर देण्यात येत नसल्याची कोणत्याही रूग्णवाहिका चालकाची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत नाही.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधीष्ठाता, स्वाराती रूग्णालय
यापुढे मृतांवर तातडीने अंत्यसंस्कारयानंतर कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.- शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई
‘मानवलोक’ची रूग्णवाहिका उपलब्ध
‘मानवलोक’ची रूग्णवाहिका कोणत्याही क्षणी उपलब्ध करून देण्याची आम्ही प्रशासनाला तयारी दाखविली आहे. लोखंडीच्या कोविड सेंटरमधून आमची रूग्णवाहिका नियमित मागवली जाते. स्वाराती रूग्णालयालाही ती देण्याची आमची तयारी आहे.- अनिकेत लोहिया, कार्यवाह, मानवलोक