परळी : येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात अनेक वयोवृद्ध, बेवारस निराधार लोक असतात. लॉकडाऊनमुळे अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत अशा १६ निराधारांना आसरा मिळवून दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व त्यांची टीम या लोकांना वृद्धाश्रमात नेण्यासाठी तिथे गेले असता सुरुवातीला ते लोक आश्रमात जायला तयार नव्हते. डॉ. मडावी यांनी याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुंडे यांनी त्या लोकांशी चर्चा करून त्यांना निवारा, जेवणाची व आरोग्यविषयक सोय करण्याबाबत आश्वस्त करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या सर्व १६ लोकांना आता घाटनांदूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या वृद्धाश्रमात नेण्यात आले आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत. समाज कल्याण विभागाचे अधिकारी व त्यांची टीम निराधार, भिक्षुक, मानसिक रुग्ण अशा लोकांना निवारा, जेवण व आरोग्यविषयक सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.