- पुरूषोत्तम करवामाजलगाव : येथील नगरपालिकेला अनेक महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व सध्या नगराध्यक्ष देखील न्यायालय कोठडीत असल्यामुळे शहराकडे लक्ष देणारे कोणीच राहिले नसल्याने शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ होत असून 15-15 दिवस पाणी मिळत नसल्यामुळे ऐन संचारबंदीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
येथील नगरपालिकेला मागील चार-पाच महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व आठ-पंधरा दिवसापुरता कोणाकडेतरी चार्ज दिला जातो मात्र ते देखील याठिकाणी येण्यास धजावत नाहीत. ते आले तरी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस या नगरपालिकेला भेटी देतात. यामुळे नगरपालिकेत कोणतेच काम होत नसून कर्मचाऱ्यांवर देखील कोणाचा वचक राहिला नाही. नगराध्यक्ष सहाल चाऊस हे पाणी प्रश्नाकडे जातीने लक्ष देत असत परंतु ते 4 मार्च पासुन भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीतअसल्यामुळे पाणीप्रश्न कडे कोणाचेच लक्ष राहिले नाही. पाणीपुरवठा सभापती हे केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसलाच प्रयत्न केला नसल्याचा आरोप नागरिकातुन होत आहे. ऐन संचारबंदीत नागरिकांना बाहेर निघू नयेत असे आदेश असताना मात्र पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. व अनेकांना पाणी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहून पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक जवळजवळ उभे राहत असून जास्तीत जास्त संपर्कात येत आहेत. यामूळे कोरोनाची लागण लागायला वेळ लागणार नाही.
शहरातील शाहूनगर ,आझादनगर ,सन्मित्र कॉलनी ,आयोध्या नगर , पाटील गल्ली , इदगा मोहल्ला , शिवाजीनगर , तानाजी नगर ,भिमनगर आदी भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असुन शहरात अनेक ठिकाणी हातपंप नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. घरोघरी पोहोच करणारे पाण्याचे जार आत्ता जाऊन आणावे लागत असून त्यांनीही पाण्याच्या जारचा भाव देखील वाढला आहे.
न.प.च्या पाण्यावर अनेक जणांनी केली गडगंज कमाई नगरपालिकेने मुख्य टाकीवरून शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत दोन-तीन ठिकाणी वाल्व बसवले असून याठिकाणी पाण्याची विक्री करणाऱ्यांनी एक डायरेक्ट नळ सुरु केला असून दररोज या नळावरून पन्नास ते शंभर गाड्या या ठिकाणावर भरून घेऊन विक्री केली जातात. यातून हे लोक गडगंज कमाई करत असून एक रुपयाही नगरपालिकेला टॅक्स भरत नाहीत. उलट जे नागरिक टॅक्स भरतात त्यांना 15 -15 दिवसाला पाणी तर विक्री करणाऱ्या लोकांना दररोज पाणी.
पूर्वीप्रमाणे 4-5 दिवसाला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत व लवकरच पहिल्या प्रमाणे पाणी मिळेल.- भागवत बिघोत, प्रभारी मुख्याधिकारी