बीड : २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून मृत्यूशी दिलेली झुंज सोमवारी पहाटे अपयशी ठरली. त्यानंतर पुन्हा चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला. परंतु अचानक कोणी तरी तक्रार केली आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे गावात गेलेला मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून पालिकेने अंत्यसंस्कार केले. यात सर्व प्रशासनाची चूक असतानाही केवळ दादागिरी करत मृतदेह पळविल्याचा बनाव करीत नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील ३२ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. तिला जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल केले. रविवारी मध्यरात्री तिची प्रकृती अचानक खालावली आणि सोमवारी पहाटे तिची प्राणज्याेत मालवली. आयसीएमआरच्या नियमानुसार पॉझिटिव्ह मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. त्यामुळे या महिलेची पुन्हा अँटिजन तपासणी करण्यात आली. यात ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी कुंभारवाडीला नेला. परंतु तोपर्यंत इकडे काही लोकांनी आरडाओरड केली. ही माहिती तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क करून मृतदेह परत बोलावून घेतला. नंतर आयसीएमआरच्या नियमानुसार नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले. दरम्यान, हा सर्व प्रकार अंगलट येणार हे लक्षात आल्यावर येथील अधिकाऱ्यांनी परिचारिकेला पुढे करीत नातेवाईकांविरोधात फिर्याद देण्याबाबत दबाव टाकला. त्यानंतर पिंगळे नामक परिचारिकेच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात मयताच्या पतीसह इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दहा दिवसांत कोरोनामुक्तआयसीएमआरच्या नियमानुसार एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यावर दहा दिवसांत त्याला काही लक्षणे नसल्यास कोरोनामुक्त घोषित केले जाते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. यात ती दगावली. तब्बल २४ दिवस झालेले असल्याने तिची अँटिजन चाचणी केली असता निगेटिव्ह आली. त्यामुळे हरकत न घेता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येतो. परंतु आरोग्य विभाग व प्रशासनाने दादागिरी करत उलट नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केला. याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
वॉर्डबॉयने आणला मृतेदह, पोलीसही गेटवर तैनातमृतदेह पळविल्याची फिर्याद पिंगळे नामक परिचारिकेने दिली आहे. वास्तविक पाहता वॉर्डमधून रुग्णवाहिकेपर्यंत हा मृतदेह रुग्णालयाच्याच लोकांनी आणला आहे. तसेच मुख्य गेटवर सर्व पोलीसही उपस्थित होते. सर्वांच्या साक्षीने नेलेल्या मृतदेहाला पळविले कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणतात नातेवाईक...कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने सर्व सोपस्कार पूर्ण करूनच मृतदेह नेला. प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत आहे. मृतदेह पळवून न्यायला ती काय वस्तू आहे का? सर्व कागदपत्रे पाहिल्यावर खरे काय ते समोर येईल, असे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.
याला जबाबदार कोण?आठवड्यापूर्वीच एका महिलेचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. हा प्रकारदेखील असाच होता. आता यात मृतदेहाची अवहेलना झाली. याला प्रशासन की नातेवाईक यापैकी कोण जबाबदार आहे. मृतदेह खरोखरच पळविला असेल तर यंत्रणा काय करतेय? असा सवाल उपस्थित होत आहे.
काय म्हणतात, एसीएस राठोड...याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड म्हणाले, संंबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. सोमवारी मयत झाल्यावर तिची अँटिजन चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली, हे खरे आहे. परंतु तिला पॉझिटिव्हचे लेबल लागलेले होते. आयसीएमआरचे नियम काय आहेत ते पाहावे लागतील. संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितलेले आहे. चाचणी निगेटिव्ह असल्यावर मृतदेह ताब्यात देणे चूक की बरोबर, मृतदेहाची अवहेलना आणि कारवाईला जबाबदार कोण? असे विचारताच डॉ. राठोड यांना उत्तर देता आले नाही.