बीड : जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेविका अनिता जोगदंड-भोसले यांनी दहा दिवस कोरोनाशी झुंज दिली. परंतू ती अपयशी ठरल्याने रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. प्राणाची आहुती देऊन रूग्णसेवा देणाऱ्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अधिकारीही भावूक झाले. अनिता भोसले यांना रूग्णालय प्रशासनाकडून श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
अनिता भाेसले या स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात कर्तव्य बजावत होत्या. २६ मे रोजी त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना तात्काळ कोरोना वॉर्डातील आयसीयू २ मध्ये दाखल करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर फिजिशियन व इतर तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. परंतू याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सकाळपासून रूग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. रूग्णवाहिकेतून स्मशानभूमित नेण्यापूर्वी जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्यासह मुकादम, परिचारीका, कर्मचारी, आरोग्य सेवक आदी उपस्थित होते.
अमर रहे , अनिता भोसले अमर रहेश्रद्धांजली अर्पण केल्यानंतर रूग्णवाहिका मार्गस्थ होणार एवढ्यात सर्वांनीच अमर रहे अमर रहे, अनिता भोसले अमर रहे, अशा घोषणा केल्या. यामुळे परिसर भावूक झाला होता. सहकारी परिचारीका व आरोग्य सेविकांनी आक्रोश केला. यामुळे अधिकाऱ्यांसह उपस्थिती सर्वच भावूक झाले होते. आगोदरच छाया बहिरे या परिचारीकेला गमावल्यानंतर जिल्हा रूग्णालयाने अनिता भाेसले यांच्या रूपाने दुसरी कोरोना योद्धा गमावली आहे.