- मधुकर सिरसट/दीपक नाईकवाडेकेज : तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर उत्तर भारतातील बिहार व उत्तरप्रदेश येथून आणलेल्या मजूरांना सध्या चोहिकडे संचारबंदी आणि जमावबंदी आसल्यामुळे वा-यावर सोडून गुत्तेदाराने पलायन केले. त्यामूळे आठदिवसापासून उपाशी पोटी राहणा-या या मजूराच्या तांड्याने अशा परिस्थितीत अन्नपाण्या वाचून कामावर तडफडून मरण्यापेक्षा हजारो किमीचा प्रवास पायी पायी करून आपल्या कुटूंबीयाना भेटण्यासाठी जाण्याचा निर्धार करुन हे मजूर शनिवारी साळेगाव येथून पायपिट करीत केजला आले.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सर्वत्र जिल्हाबंदी आणि संचारबंदी आहे. मात्र अशा वाईट परिस्थितीत उत्तर भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात राष्ट्रीय महांमार्गाच्या कामावर आलेले मजूर पायीच गावाकडे निघाले आहेत. त्यांच्याकडे ना अन्न पाणी; ना काही सामान आहे. या मजुरांना कामाला घेऊन आलेले परप्रांतीय गुत्तेदारही फरार झाला आहे. त्यामुळे आता कामाच्या ठिकाणी त्यांच्या खानावळी बंद झाल्या आहेत. म्हणून आता अन्नपाण्यावाचून जनावरा सारखे तडफडून उपाशी जिवन जगण्या ऐवजी या मजुरांचा काफीला आता दैवावर भरोसा ठेवून; दिसेल त्या वाटेने; पुढे कोणते संकट येणार आहे. त्याची पुसटशीही कल्पना नसताना आणि आता आपण घरी पोहचू की नाही .याची कोणतीही तमा न बाळगता; रखरखत्या उन्हातान्हाची पर्वा न करता आपल्या भागाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या असून या परप्रांतीय मजूरांचा पुढील प्रवास कसा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या परप्रांतीय मजुरांना वा-यावर सोडून देणा-या गुत्तेदारा विरूद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड,सामाजिक कार्यकर्ते प्रा हनुमंत भोसले , सेवाभावी संस्थेच्या सविता सोनवणे, जनाताई खाडे यांनी केली आहे.
खाकितील माणुसकी जागी झाली
साळेगाव येथून पायी निघालेल्या या परप्रांतीय मजुरांना पोलिसांनी हटकले आसता धक्कादायक प्रकार समोर आला. तेंव्हा खाकितील माणुसकिला पाझर फुटला आणि केज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईनामदार, गौतम बचुटे व बलभीम बचुटे यांनी शिवाजी चौकात या परप्रांतीय मजूरांना बिस्कीट व पाण्याची व्यवस्था केली.तहसिलदारही धावले मदतीला
रविवारी दुपारी 16 परप्रांतीय मजुरांच्या अल्पोपाहारासाठी तहसीलदार डी सी मेंढके, ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे, चोपणे यांनी मदतीचा हात दिला.तसेच त्यांनी या मजुरांना परप्रांतात जाण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.