- सोमनाथ खताळ
बीड : उपचारातील हलगर्जीपणा आणि उपाययोजनेतील अपयश उघड होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना बळी लपवून ठेवण्याचा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. रविवारपर्यंत लपविलेल्या तब्बल २०४ कोरोना बळींची नोंद आयसीएमआर पोर्टलवर केली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. ‘लोकमत’ने आरोग्य विभाग व प्रशासनाच्या अपयशाचा यानिमित्ताने पर्दाफाश केला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र थांबत नाहीये. दुसऱ्या लाटेत तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांच्या रांगाच लागत आहेत. असे असतानाही आरोग्य विभागाकडून कमी मृत्यू दाखविले जात होते. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने स्मशानातील आणि आरोग्य विभागाने नोंदविलेल्या आकड्यांची तुलना केली. यात केवळ एप्रिल महिन्यात १०५ मृत्यूंची तफावत आढळली. यावरून आरोग्य विभागाकडून हे काेरोना बळी लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ‘लोकमत’ने ९ मे रोजी वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर रोज ३० पेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद पोर्टलवर होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २०४ कोरोना बळी पोर्टलवर झळकले आहेत. हे सर्व बळी आरोग्य विभागाने एवढ्या दिवस लपवून ठेवले होते. विशेष म्हणजे हा आकडा रोजच वाढत आहे. त्यामुळे आणखी किती कोरोना बळींची नोंद होणार, हे येणारी वेळच ठरवील.
राज्याच्या आरोग्य संचालिका म्हणतात...सर्व माहिती अपडेट ठेवण्यासाठी वारंवार सूचना केल्या जातात. तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला असेल; परंतु मृत्यूचा आकडा खूप मोठा आहे, असे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त रामास्वामी यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही, तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा भ्रमणध्वनी बंद होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी, व्यस्त असल्याचा संदेश पाठविला. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
अशी झाली लपविलेल्या कोरोना बळींची नोंद...१० मे - ३५११ मे - ३५१२ मे - २०१३ मे - ५११४ मे - १११५ मे - १६१६ मे - ३६एकूण - २०४