लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच सर्वाधिक रुग्ण हे बीड शहरात आढळत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. याची जबाबदारी पालिकांवर सोपविली जात आहे; परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्यांना कसलाच निधी दिला जात नाही. कोरोना रोखायचा; पण निधी आणायचा कोठून? असा प्रश्न पालिका, नगर पंचायतींसमोर आहे. हे गाऱ्हाणे केवळ बीड पालिकेचे नसून जिल्ह्यातील सर्च पालिका आणि नगर पंचायतींचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या २८ हजाराच्या घरात पोहोचली आहे, तसेच सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजाराच्यावर गेली असून, त्यातील बीड शहरातील ९११ रुग्णांचा समावेश आहे. लक्षणे नसणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात असल्याने खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे सीसीसीची संख्याही वाढविली जात आहे; परंतु निधी मिळत नसल्याने पालिका, पंचायती अडचणीत आल्या आहेत. त्यांच्याकडून पत्रव्यवहारही केले जात आहेत.
कर्मचाऱ्यांचे वेतनही होईना
कोरोनाचा सर्वात जास्त फटका पालिका, नगर पंचायतींना बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याने पालिकेला स्वखर्चातून सर्व उपाययोजना कराव्या लागत आहेत. यामुळे निधी खर्च होऊन कर्मचाऱ्यांचे वेतनही करण्यास अडचणी येत आहेत. पालिका, नगर पंचायतीच सध्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
कोविड केअर सेंटर वाढवायचे, पण...
जसा कोरोना वाढत गेला, तसे कोविड केअर सेंटर वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जातात; परंतु त्यातील उपाययोजना आणि नियोजनासाठी खर्च करण्यासाठी निधी दिला जात नाही. या सेंटरमधील पाणी, स्वच्छता आदी कामे करण्याची जबाबदारी पालिकांची आहे. प्रशासनाचे आदेश असल्याने त्यांनाही गुपचूप कारवाईला सुरुवात करावी लागते.
बीड शहरात आतापर्यंत कोरोना उपाययोजनांसाठी ७७ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. हा सर्व निधी पालिकेच्या फंडातून केला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आम्ही वारंवार निधीसंदर्भात मागणी केलेली आहे; परंतु अद्याप एकही रुपया मिळाला नाही. इतर नगरपालिकांची उदाहरणे दिली; परंतु अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. निधी द्यावा, एवढीच अपेक्षा आहे.
-डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद, बीड.