माजलगाव : नगर पालिकेतील पाणीपुरवठा, अग्निशमन दल विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागील सात महिन्यापासून पगार न झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार मागणी करूनही पगार न दिल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी गुरुवार दि. २३ सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केले होते; परंतु लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
कोरोनाचा फैलाव वेगाने वेगाने होत असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व नागरीक घरात बसलेले आहेत. अशा परस्थितीत अत्यावश्यक सेवेत येणारे सर्वच अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर येऊन काम करत नागरिकांना सुवढा पुरविण्याचे काम करतात. अशा परस्थितीत त्यांना किमान त्यांच्या कामाचा मोबदला तरी वेळेवर देणे गरजेचे आहे. माजलगाव नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील १९ कर्मचारी तर, अग्निशमन दल विभागातील १५ असे एकूण ३४ कर्मचाऱ्यांचा मागील सात महिन्यापासून पालिकेने पगार केलेला नाही.
पगार नसतानाही या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही जीव धोक्यात घालून शहरातील पाणीपुरवठा नियमित सुरु ठेवला होता; परंतु पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याकडे वारंवार मागणी करूनही पगारीचे पैसे दिले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यावर उपसले आहे. गुरुवार दि. २३ पासून पाणीपुरवठा आणि अग्निशमन दल विभागातील कर्मचारी कामावर न जाता त्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असून अशा परिस्थितीत पाणी बंद झाल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुपारी मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती, पदाधिकारी यांनी मध्यस्ती करून कर्मचाऱ्यांना विनंती केली. यामुळे कर्मचाऱ्यांनी सकाळपासून पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.
काही कारणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारी रखडल्या असून येत्या चार, पाच दिवसात त्यांच्या पगारी देण्यात येणार आहेत.- भागवत बिघोत, मुख्याधिकारी
सध्या लॉकडाऊन असल्याने आमच्या आंदोलनाने नागरिकांची गैरसोय होईल ती टाळण्यासाठी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत पगार न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.- बजरंग पांचाळ, कर्मचारी.