अंबाजोगाई : कोरोनाचा आजार बळावल्यानंतर नातेवाईकांनी स्वा.रा.ती. रुग्णालयात धरून आणले. सात दिवसांच्या योग्य उपचारानंतर ९० वर्षीय आजोबा कोरोनामुक्त होऊन स्वतः घरी चालत गेले. मन प्रसन्न ठेवा. घाबरू नका. काहीही होत नाही, असा सल्ला तालुक्यातील जवळगाव येथील माजी सरपंच नारायणराव कटारे यांनी दिला.
अंबाजोगाई येथील ९० वर्षीय आजोबा नारायणराव कटारे यांना कोरोनाची बाधा झाली. प्रचंड थकवा व त्रास जाणवू लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोना कक्ष प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर योग्य उपचार झाले. अवघ्या सातच दिवसांत आजोबांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. नातेवाईकांनी आधार देत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेच आजोबा ठणठणीत होऊन स्वतः च्या पायांनी चालत आपल्या गावी गेले.
कोरोना झाला म्हटले की अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु लक्षणे दिसली आणि लवकर तपासणी झाली की तत्पर इलाज वरदान ठरतो. याचा प्रत्यय आजपर्यंत हजारो रुग्णांना आलेला आहे. नारायणराव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबही चिंतीत झाले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तीन दिवसांत त्यांच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सात दिवसांत ते पूर्णतः बरे नव्हे तर ठणठणीत झाले.
व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्यास व त्यांनी सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास तो कोणत्याही आजारावर मात करू शकतो. यासाठी आहार, विहार व विचार चांगले असावेत. आहे त्या स्थितीत परिस्थितीला सामोरे जाता आले पाहिजे. हीच किमया नारायणराव कटारे यांनी साध्य करीत कोरोनाला हद्दपार केले.
- डॉ. सिद्धेश्वर बिराजदार
कोरोना कक्ष प्रमुख,स्वा.रा.ती. रुग्णालय, अंबाजोगाई.
===Photopath===
250421\avinash mudegaonkar_img-20210425-wa0049_14.jpg