शिरुर कासार (जि. बीड) : कोरोनामुळे निधन झाल्यानंतर आम्हांला गावातील लोकांनी पिण्यास पाणीही दिले नाही, अशी तक्रार बीड जिल्ह्यातील वारणी गावातील धोत्रे कुटुंबाने केल्याने खळबळ माजली. नायब तहसीलदार किशोर सानप यांनी या घटनेचा इन्कार केला. गावचे सरपंच तसेच पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव केदार यांनी पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आणि ५ हजार रुपये खर्चासाठी दिले होते, असे सानप यांनी सांगितले.
वारणी येथील धोतरे कुटुंबातील सोनाबाई धोतरे (५५) यांचे दोन दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. अंत्यविधी प्रशासनाने केला. अंत्यविधीनंतर धोतरे कुटुंबीय गावात परतले. तेव्हा आम्हांला दोन दिवस कोणी पाणी दिले नाही, मदत केली नाही, अशी तक्रार या कुटुंबीयांची होती. धोतरे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि इतर वारणी गावापासून २ किलोमीटरवर असलेल्या वस्तीवर राहतात. या कुटुंबातील चौघांपैकी दोघेजण अंध असून, दोघांना कमी दिसते.
यासंदर्भात नायब तहसीलदार किशोर सानप यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, सरपंचांसह आम्ही या वस्तीला भेट दिली. त्यांना सार्वजनिक ठिकाणी हातपंपावर पाणी भरण्यास कोणीही अडथळा केला नाही. धान्य देखील दिले. तसेच सरपंचांनी ५ हजार रुपये खर्चासाठी दिले. कोणाचीही अडचण नाही. वाळीत टाकण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
गावातील शिरूर कासार पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव केदार यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, आमचे गाव आदर्श आहे. असा प्रकार घडला नाही. ही वस्ती गावापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी पाणी दिले नाही किंवा सहकार्य केले नाही, याचा अर्थ संपूर्ण गावाने वाळीत टाकले, असा होत नाही. या लोकांना आम्ही नेहमीच मदत केली आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य दिले, खर्चासाठी ५ हजार रुपये दिले. असा आरोप करणे म्हणजे गावाची विनाकारण बदनामी होय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसट यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, वस्तीवरील शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मदत केली नाही. शेजारचा बोअर मी स्वत: सुरू करून पाणी दिले. ग्रामपंचायतीच्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावयास पाहिजे होते.