- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनाच्या अनुषंगाने सोशल सामाजिक अंतराचा मुद्दा ठेवून खून, मारामारी, चोरीसारख्या गुन्ह्यांतील ५० अट्टल गुन्हेगारांना ४५ दिवसांसाठी तात्पुरता जामिन दिला आहे. त्यामुळे या आरोपींना मोकळे रान मिळाले आहे.
राज्य शासनाने ठराविक गुन्ह्यांतील आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे बीड कारागृहातील २४४ आरोपींची यादी विधी प्राधिकरण विभागाला देण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने कारवाई करून आरोपींना अटी घालून जामिनावर सोडले आहे. आतापर्यंत तरी पोलिसांना त्यांचा ताण झालेला नसल्याचे दिसते.
या गुन्ह्यातील आरोपींना सुटकाखून, चोरी, मारामारी यासह इतर किरकोळ गुन्ह्यातील आरोपींना जामिन दिलेला आहे. ही सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने झालेली आहे. दरम्यान, बलात्कार, आर्थिक गुन्हे, फसवणूक, दरोडा, लुटमार, अंमली पदार्थाची तस्करी, अपहरण, खंडणी, पोक्सो, एमपीडीए, मोका या गुन्ह्यांतील आरोपींना जामिन दिलेला नाही. यामुळे हे अरोपी सध्याही कारागृहातच आहेत.
जवळच्या पोलीस ठाण्यात लावताहेत हजेरी?जे आरोपी तात्पुरत्या जामिनावर बाहेर पडले आहेत, त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात जावून नियमित हजेरी लावावी लागत आहे. बाहेर गेल्यावर पुन्हा गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत सर्वांना सुचना केलेल्या होत्या. अद्याप तरी गुन्हे घडलेले नाहीत.गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारागृहातून आलेल्या आरोपीला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात अशा आरोपींच्या संदर्भाने एकही घटना नाही.
कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी कमी व्हावी, यासाठी वरिष्ठांकडून आलेले निर्देश आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ५० आरोपी ४५ दिवसांच्या तात्पुरत्या जामिनावर आहेत. - एम.एस.पवार, कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह बीड