कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व काही ठप्प झाले आहे.
जशी सर्वच उद्योग व्यवसायाला बंधने आली, त्याच पद्धतीने वकिली व्यवसायावर ही बंधने आली. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तो १४ महिने कायम आहे. या कालावधीत न्यायालयीन कामकाज जरी सुरू राहिले, तरी वेळेची मर्यादा व व्यक्तींची मर्यादा व कडक नियम यामुळे ज्यांचे काम असेल, तोच न्यायालय परिसरात फक्त कामाच्या वेळेत उपस्थित राहात असे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने नागरिक काम असूनही न्यायालयाकडे जात नाहीत. त्यातच विविध कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालय व इतर आस्थापना बंद राहिल्याने वकिलांसह नोटरींची सर्व कामे मंदावली आहेत. नवीन नोटरींना रजिस्टर, नोटरी रिसीटबुक व शिक्के बनवून मिळत नसल्याने अनेकांची कामे बंद झाली आहेत. मागील काही दिवसांमध्ये वकिलांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यात ज्यांनी आता नवीनच वकिली सुरू केली अन् लॉकडाऊन लागले, अशा वकिलांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
काही वकिलांकडे अन्य दिवसांमध्येही पाहिजे तसे कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी वकिली व्यवसायालाही कोरोनाचा फटका बसला आहे.
टायपिस्टही आले अडचणीत
न्यायालय, तहसील कार्यालय, रजिस्ट्री व विविध कार्यालयांच्या परिसरात संगणक तसेच टायपिंगवर विविध कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टायपिस्टलाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीवर मात करून अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. एकंदरीतच विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना या लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गरजू वकिलांना जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप
कोरोनामुळे लॉकडाऊन असून, त्यामुळे न्यायालयीन कामकाज बंद असल्याने वकिलांची होत असलेली आर्थिक कोंडी लक्षात घेऊन अंबाजोगाई येथील वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शरद लोमटे यांनी त्यांच्यातर्फे गरजू व आर्थिक विवंचनेत असलेल्या वकिलांना जीवनावश्यक वस्तूंचे रेशन कीट वाटप केले.
जवळपास २५ गरजू वकिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन कीटचे वाटप झाले.
यावेळी वकील संघाचे सचिव ॲड.अनंत तिडके, सहसचिव ॲड. लक्ष्मीकांत देशपांडे व लिपिक सिद्धेश्वर स्वामी उपस्थित होते.