लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कोप झाला आहे. आतापर्यंत बीड नगरपालिकेने तब्बल ६१२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी पालिकेने ४० लाख रुपये खर्च केला आहे. यातील २३ लाख रुपये नगरपालिकेच्या निधीतून खर्च करण्यात आले आहेत तर १६ लाख रुपये विशेष निधीतून खर्च केल्याचे सांगण्यात आले.
पालिकेला अंत्यसंस्कारासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आला होता. यातील जवळपास एक कोटी रुपये विद्युत दाहिनीसाठी तर इतर ५० लाख रुपये हे आरोग्य विभागाला साहित्य वाटपास देण्यात आले आहेत. इतर निधीचेही योग्य नियोजन करून खर्च केल्याचा दावा मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी केला आहे.
दरम्यान, कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची पूर्ण जबाबदारी ही पालिकेवर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे आवश्यक मनुष्यबळ व साहित्य पालिकेकडूनच उपलब्ध करून दिले जात आहे.
एका अंत्यसंस्काराचा खर्च ६५०० रुपये
एका अंत्यसंस्कारासाठी साधारण ६ हजार ५०० रुपये खर्च येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात लाकूड, इंधन व इतर साहित्याचा समावेश आहे.
पालिका खर्च करीत असली तरी बीड शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून नातेवाईकांची दिशाभूल करत पैसे वसूल केल्याच्या तक्रारीही प्राप्त आहेत.
असे असले तरी एकाही नातेवाईकाने लेखी स्वरूपात प्रशासनाकडे तक्रार केली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
अंत्यसंस्काराची जबाबदारी ही स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे.
मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग काम करीत आहेत.
स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, प्रशांत ओव्हाळ यांच्यासह धांडे व इतर कर्मचारी नियोजन करतात.
रात्र असो वा दिवस. हे सर्व लोक आलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.