माजलगाव : शासनाने संजय गांधी व वृद्धापकाळ निराधार योजनेचे १ कोटी ४५ लाख रुपये टपाल विभागाकडे वर्ग केले असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनुदान वाटपास विलंब होत आहे. लवकरच वाटप सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. गरीब, गरजू निराधारांना कोरोनाकाळात अनुदानाची ही रक्कम मोठा आधार व दिलासा देणारी ठरणार आहे.
राज्य शासन गोरगरीब, निराधार, वृद्ध लोकांना उपजीविका भागविण्यासाठी दरमहा रक्कम संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, आदी योजनेच्या माध्यमातून देत असते. शासनाकडून जसा निधी उपलब्ध होईल तसे तीन-चार महिन्यांचे अनुदान एकदाच वाटप करण्यात येते. शासनाच्या वतीने नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीतील मिळालेला निधी येथील तहसील कार्यालयाने वर्ग केला आहे. तालुक्यातील ४४०८ लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये येथील पोस्ट ऑफिसमध्ये वर्ग केले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. मागील चार महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांची उपासमार होत होती. वृद्धापकाळात लागणाऱ्या गोळ्या-औषधांसाठी या गरजूंना इतरांकडे पैशासाठी हात पसरावे लागत होते. असे असताना आता शासनाने अनुदानाची रक्कम खात्यावर जमा केल्याने निराधारांना मोठा आधार मिळणार आहे.
शासनाने पैसे खात्यावर वर्ग केले असून, कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ न देता अंतर राखून लवकरच वाटप सुरू करण्यात येईल
--जितेंद्र सावध, पोस्टमास्तर.
संजय गांधी व वृद्धापकाळ निराधार योजनेचे लाभार्थी
माजलगाव शहर ३३००
ग्रामीण भागात ११०८