माजलगाव : तालुक्यातील तीन ते चार गावातील जवळपास ११७ ऊसतोड मजुर सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी मागील पाच-सहा दिवसांपासून अडकले आहेत. त्यांना निगराणी ठेवण्यात आले असून या सर्व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजलगाव तालुक्यातुन पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मजुर ऊस तोडणीसाठी जात असतात. हे सर्व ऊस तोडणी कामगार इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्यात गेले होते. भारतात सर्व ठिकाणी संचारबंदी लावल्याने हे सर्व कारखाने बंद करण्यात आले व मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठवण्यात आले. ते गावी परतत असताना त्यांना मिरज जवळ अडवुन त्यांना ढवळा या गावी निगरानीत ठेवण्यात आले आहे.
यात माजलगाव तालुक्यातील लवूळ , लिमगाव, ढोरगाव या गावातील 5 टोळया असुन यात 100 मजुरांचा समावेश आहे. यात 40 महिला 20 बालके व 50 पुरुषांना समावेश आहे. तर 4-5 जण गेवराई तालुक्यातील राजापुर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या मजुरांनी दोन दिवसापूर्वी रात्री या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी परत त्यांना पकडून आणले.