सोमनाथ खताळबीड : उपचारातील हलगर्जीपणा आणि उपाययोजनेतील अपयश उघड होऊ नये यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना बळी लपवून ठेवण्याचा प्रकार केला होता; परंतु ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली. रविवारपर्यंत लपविलेल्या तब्बल २०४ कोरोना बळींचा शोध लागला असून त्यांची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे.
दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. ‘लोकमत’ने आरोग्य विभाग व प्रशासनाच्या अपयशाचा या निमित्ताने पर्दाफाश केला आहे.मृतांची नोंद आणि स्मशानातील नोंद यात तफावत आढळली होती. केवळ एप्रिल महिन्यात १०५ मृत्यूंची तफावत आढळली. लोकमत ने याबाबत वृत्त दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि दररोज ३० पेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद पोर्टलवर होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २०४ कोरोना बळी पोर्टलवर झळकले आहेत.
राज्याच्या आरोग्य संचालिका म्हणतात..सर्व माहिती अपडेट ठेवण्यासाठी वारंवार सूचना केल्या जातात. तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला असेल. याबाबत मी बीड जिल्हा आरोग्य विभागाला विचारते. असे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.