बीड : मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीडच्या कोरोनाबाधितांची संख्या आता ९ झाली आहे.
मूळचे अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवासी असलेले कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले. १४ तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. २ दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पथक पाठवून या कुटुंबाला जिल्हा रुग्णालयात आणले. शनिवारी रात्री त्यांचा स्वॅब घेतला. यामध्ये ७ ही लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शनिवारी माजलगाव तालुक्यातील हिवरा व गेवराई तालुक्यातील इटकूर येथे दोन कोरोनाबाधित आढळले होते. आता बाधितांची संख्या ९ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.