- अनिल महाजन
धारुर : शहरातील रहिवाशी डॉ. गौरव शक्तिसिंह हजारी या तरुणाचा विवाह 19 मार्च रोजी पार पडला. दरम्यान, कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी कठीण काळात कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश त्याला मिळाला, अंगाची हळद निघालेली नसताना सुटी रद्द करून गौरव कर्तव्यावर हजर झाला. मागील एक महिन्यापासून डॉ. गौरव पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत आहे.
धारूर शहरातील हजारी परीवार हा सामाजीक कार्यात सतत अग्रेसर असतो. शक्तीसिंह राजपालसिंह हजारी यांची दोन्ही मुले सध्या कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागात सेवा देत आहेत. त्यांचा मुलगा डॉ. गौरव पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत आहे. 19 मार्चला नागपूर येथे डॉ. शानू बरोबर तो विवाह बंधनात अडकला. यासाठी त्याने एक महिन्याची रजा घेतली होती. मात्र, या दरम्यान २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. तसेच वरिष्ठांनी कोरोनाच्या जागतिक संकटास लढण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यामुळे देशसेवेच्या भावनेतून डॉ. गौरव याने पुढील रजा रद्द केली व ससून रुग्णालयात कर्तव्यावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. लग्नातील अंगाची हळद पूर्ण निघालेली नसतानाही डॉ. गौरव १ एप्रिलपासून आपल्या कमावर रुजू झाला. ससून रुग्णालयात कोरोना कक्षात तो कर्तव्य बजावत आहे. वैयक्तिक आनंद टाळून सेवेला प्राधान्य देण्याच्या डॉ. गौरव याच्या भूमिकेचे सर्वञ कौतूक होत आहे.