माजलगाव : शहरानजीक असलेल्या ईगलवूड कोव्हीड सेंटरमध्ये मयत झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे घेण्यावरून नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक, पाणीपुरवठा अभियंता, कंटेंटमेंट झोन प्रमुख व सफाई कामगारांमध्ये मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सफाई कामगार विलेश कांबळे याने या ३ कर्मचाऱ्यांच्या विरोधात शहर पोलीसात तक्रार दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
कोरोना मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून सर्रास व खुलेआम पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी 18 एप्रिल रोजी कोव्हीड सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या खा. प्रीतम मुंडे यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली होती. त्यांनी कोणालाही एक रूपयाही देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. परंतु, पैसे न दिल्यास अंत्यविधीसाठी हे कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यामुळे उशीर होत असल्याने नातेवाईकांना नाईलाजास्तव पैसे दयावे लागतात. या रक्कमेवरुन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही पुढे आले आहे.
मंगळवारी रात्री ईगलवूड कोव्हीड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता.या मयत झालेल्या रूग्णाचा मृतदेह नगरपालिकेचे सफाई कामगार विलेश कांबळे व संकेत कांबळे हे बांधत असतांना या ठिकाणी नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे, पाणीपुरवठा अभियंता जगदीश जाधवर, कंटेंटमेंट झोन प्रमुख संतोष घाडगे हे मद्यपान करून आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना तुम्ही हा मृतदेह कस काय बांधत आहात असे विचारत शिवीगाळ केली. या मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून आम्हाला 20 हजार रुपये घ्यायचे आहेत असे ते ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या नंतर सफाई कामगार व या तीन कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन मारामारी झाली असल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.
यानंतर काही नागरिकांनी पुढाकार घेऊन भांडण सोडवले. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर विलेश कांबळे यांनी गणेश डोंगरे, जगदीश जाधवर, संतोष घाडगे यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.दरम्यान, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वादात अंत्यसंस्काराविना मृतदेहाची अवहेलना होत असल्याने नातेवाईकांमधून नगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत मला काहीही माहीती नसल्याचे येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले. तर येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. मात्र, माझ्याकडे कोणीही तक्रार दिलेली नाही.
नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे, पाणीपुरवठा अभियंता जगदीश जाधवर, कंटेंटमेंट झोन प्रमुख संतोष घाडगे मद्यपान करून आले. आमच्याशी वाद घालत त्यांनी मारहाण केली. तिघेजण मयताच्या नातेवाईकांना २० हजार रुपयांची मागणी वारंवार करत होते.- विलेश कांबळे , सफाई कामगार न.प.माजलगाव