- पुरूषोत्तम करवा माजलगाव : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेची सोय व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या मोफत धान्य वाटप योजनेत स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु आहे. अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद होते, अनेक ठिकाणी नेमून दिलेले शासकीय अधिकारी गैरहजर, धान्य मोजून देण्या ऐवजी अंदाजे देण्याचा प्रकार सुरु होता तर, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली ग्राहकांना पावत्या न देण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु असल्या प्रकार मंगळवारी रोजी सकाळी दिसून आले.
कोरोनाचा फैलाव देशासह राज्यात मोठ्या वेगाने सुरु असल्याने पंतप्रधानांनी मागील महिनाभरापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरु केले आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये यासाठी केंद्र शासनाने देशातील सर्वसामान्यांना मोफत धान्य वाटप सुरु केले आहे. काही योजनेतून मोफत तर, अनेकांना सवलतीच्या दरात रेशनचे धान्य वाटप सुरु असल्याने स्वस्त धान्य दुकानासमोर सध्या रांगा लागत आहेत. धान्य देताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेची खबरदारी घेण्यासाठी नियमाचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी धान्य दुकानदारांना दिले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती महसूल प्रशासनाने केली आहे. असे असताना मात्र माजलगाव शहरासह तालुक्यात स्वत धान्य दुकानदारांची मनमानी सुरु असल्याने अनेक ग्राहकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
तालुक्यात एक दिवसाआड संचारबंदीची सूट असून या अडीच तासाच्या काळात धान्याचे वाटप करणे बंधनकारक आहे. असे असताना मंगळवारी दि. २१ रोजी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन आढावा घेतला असता, अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद असल्याचे आढळून आले. सुरु असलेल्या दुकानात दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे आढळून आले. काही दुकानदार सर्व्हर डाऊन असल्याच्या नावाखाली ग्राहकांना कोणतीच पावती देत नव्हते. काही दुकानात शासनाचे मोफत धान्य ग्राहकांना मोजून न देता अंदाजे देऊन कमी धान्य देत असल्याचा प्रकार पाहायला मिळाला. शहरातील मठ गल्लीतील काही दुकान दिवसभर न उघडल्याने वात पाहून ग्राहकांना हातहालवत परत जावे लागले. याठिकाणी नियुक्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची गैरहजेरी संशय निर्माण करणारी होती तर, स्वस्त धान्य दुकानासमोरी भावफलकही गायब झाल्याचे आढळून आले. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी, काह्ल्च्या यंत्रणेच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे.
ठराविक नागरिकांनाच वाटपशहरातील मोंढा येथील दुधडेअरी भागातील मार्केट फेडरेशनच्या स्वस्त धान्य दुकानचालक भागवत भोसले हे या भागातील नगरसेवक असल्याने वार्डातील ठरावीक लोकांनाच धान्याचे वाटप प्राधान्याने करीत असल्याने आम्हाला सतत चकरा मारव्या लागत असल्याचे धान्य घेण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले.
तालुक्यातील कार्ड धारक
एकूण १७८ स्वस्तधान्य दुकाने यात अंत्योदय कार्ड धारक – ३ हजार ४१२प्राधान्य कार्ड धारक – ३९ हजार ९४९शेतकरी कार्ड धारक – १५ हजार ३३१एकूण कार्ड धारक – ५७ हजार ६६७
दोषींवर कारवाई करण्यात येईलसंचारबंदी सूटच्या काळातही स्वस्त धान्य दुकाने का बंद ठेवण्यात आले त्याची दुकानचालकांना तहसील कार्यालयात बोलवून चौकशी करण्यात येईल. दोषी दुकानचालकांवर कारवाई करण्यात येईल.- प्रकाश शिरसेवाड, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग