बीड : जिल्ह्यात आणखी आठ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आता बाधितांची रुग्णसंख्या २० झाली आहे. यातील एक कोरोनामुक्त झालेला आहे. बुधवारी नव्याने ११४ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान आष्टी तालुक्यातील सात रुग्णांपैकी एक मयत झाल्याने आणि उर्वरित सहा रुग्ण पुण्याला पाठविले आहेत. त्यामुळे हे सात रुग्ण बीड जिल्ह्याच्या आकडेवारीतून वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आकडा १३ राहिला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २० कोरोनाबाधित आढळले होते. पैकी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील एका रुग्णाचा मृत्यू तर सहा उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांची संख्या जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीतून वगळली आहे. आता बाधितांचा एकूण आकडा १३ राहिला आहे. पैकी पिंपळा येथील एक कोरोनामुक्त झालेला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच बुधवारी आणखी जिल्ह्यातून ११४ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. याचा अहवाल रात्री उशिरापर्यंत येईल, असे आरोग्य सूत्रांकडून सांगण्यात आले.
कुठले आहेत हे नवे आठ बाधीत रुग्ण?
बीड शहरातील सावतामाळी चौकातील तिघे व मोमीनपुरा भागातील दोघे, केज तालुक्यातील चंदनसावरगाव व केळगाव येथील दोघे आणि गेवराई तालुक्यातील १२ वर्षीय कोरोनाबाधित मुलीची आई असे आठ रुग्ण नव्याने आढळले आहेत. या सर्वांचे स्वॅब मंगळवारी गेले होते. आता बुधवारच्या स्वॅबच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.