बीड : पुण्यातील संशयीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या विमानात बीडच्या तिघांनी प्रवास केल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाने या तिघांचीही भेट घेतली असता एक टक्काही त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याचा दावा केला आहे. ते सर्व ठणठणीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.
बीड शहरातील रहिवाशी असलेले एक कुटूंब दुबईला पर्यटनासाठी गेले होते. १ मार्च रोजी ते परतले. ज्या विमानातून ते महाराष्ट्रात आले, त्याच विमानात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याचे समोर आले. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांची नावे जाहिर करीत बीडच्या आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सुचना केल्या. त्या तिघांचीही भेट घेत तपासण्या केल्या. परंतु त्यांच्यात एक टक्काही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, किंवा त्यांना कसलाच त्रास नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्या सर्वांशी रोज संपर्क केला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
एमएस, टिएचओंची बैठकयाच घटनेला अनुसरून आणि काळजी घेण्याबाबत आज सकाळीच सर्व वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. शल्य चिकित्सक डॉ.थोरात व आरोग्य अधिकारी डॉ.पवार हे त्यांच्याशी संवाद साधून सुचना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी घाबरू नयेसध्या कोरोनाच्या अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी स्वता:ची काळजी घ्यावी. घाबरून जावू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.