माजलगाव : एकीकडे कोरोनाच्या संकटातही रेशन दुकानदार शासनाच्या स्वस्त धान्यात काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी येतात; परंतु मनुरवाडीचे दुकानदार भागवत पवारांनी मात्र विकतचे धान्यही लाभार्थ्यांना मोफत वाटप करून आदर्श निर्माण केला आहे. सवलतीच्या दरात वाटप करण्यासाठी आलेले ३४ क्विंटल गहू, तांदूळ त्यांनी गावातील २९१ लाभार्थ्यांना मोफत वाटल्याने मोठा आधार मिळाला.
राज्यात वेगाने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महिनाभरापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार, उद्योगधंदे बंद आहेत. यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होऊ नयेत म्हणून शासनाने रेशनच्या धान्याचा मोठ्याप्रमाणात पुरवठा केला आहे. खेड्यापाड्यात रेशनचे धान्य मुबलक प्रमाणात आल्याने अनेक ठिकाणचे दुकानदार कोरोनाच्या संकटातही लाभार्थ्यांच्या धान्याचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी आल्याने शासनाने कारवाई केली आहे. अशा संकटाच्या परस्थितीत मनुरवाडी (ता. माजलगाव) येथील रेशन दुकानदार भागवत पवार यांनी माणुसकी दाखवत प्राधान्य, अंत्योदय, शेतकरी योजनेतील कुटुंबातील लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात विक्रीसाठी आलेले ३४ क्विंटल गहू, तांदूळ गावातील लाभार्थ्यांना मोफत वाटप केले. गावाचे सरपंच जयराम गायकवाड, तलाठी श्री. वाघचौरे, ग्रामसेवक श्री. मंत्री यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना रेशनचे धान्य वाटप केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सामाजिक भावनेतून मदतसध्याच्या कठीण प्रसंगात गावातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. कोरोनाच्या संकटात अनेकजण विविध माध्यमातून मदत करीत असताना सामाजिक भावनेतून ग्रामस्थांना विकतचे धान्यही मोफत वाटले.- भागवत पवार, रेशन दुकानदार, मनूरवाडी.