बीड : कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत आहेत. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरमीने साप, धामिन असे प्राणी बाहेर येत आहेत. त्यामुळे सर्वांनी सावध राहून काळजी घेण्याची गरज आहे. पाटोदा तालुक्यातील वाहली आरोग्य केंद्रात घोणस जातीचा विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून २४ तास सेवा देणे बंधनकारक आहे. कोरोना लढ्यापूर्वी बोटावर मोजण्याइतकेच लोक मुख्यालयी राहून सेवा देत होते. परंतु सध्या सर्वच लोक प्रामाणिकपणे मुख्यालयी राहून कर्तव्य बजावत आहेत. याबाबत वरिष्ठांकडून आढावाही घेतला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्थित निवासस्थाने नसल्याने अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीतही योद्धे मुख्यालयी राहून कर्तव्य पार पडत आहेत.
अशातच शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वाहली आरोग्य केंद्रात ‘घोणस’ जातीच विषारी साप निघाला. कर्मचाऱ्यांच्या अगदी दरवाजात हा साप होता. सुदैवाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये तो दिसला. सर्व कर्मचारी एकत्र आले आणि त्याला तेथून काढून दिले. सर्पमित्र नसल्याने कोणीही पुढे धजावले नाही. या प्रकारामुळे अधिकारी, कर्मचा-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याला वाहलीच्या वैद्यकीय अधिका-यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.