आष्टी : तालुक्याच्या शेजारील जामखेड ( जि.अहमदनगर )शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुरक्षेची बाब म्हणून जामखेड शहरालगत असलेला ४ किमी आणि सात किमी असा बफर झोन घोषित केला. तसेच या खेड्यातून जामखेडला जाणाऱ्या सर्व चोर वाटा जेसीबीच्या साह्याने बंद करण्यात आल्या आहेत. हे गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा डोअर टु डोअर दिल्या जाणार आहेत. दरम्यान, या गावांमध्ये तहसिलदार निलिमा थेऊरकर,पोलिस उपनिरीक्षक अमित करपे,तलाठी पाटील यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना सुचना देऊन आदेशाचे पालन करा अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरामध्ये दि.२२ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जामखेड शहरापासून ४ ते ७ कि. मी.परिसर दि. २३ रोजी बफर झोन घोषित केला असून चिंचपूर,आष्टा ह. ना.शिंदे वस्ती,भातोडी,मातकुळी,क-हेवडगांव या सहा गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद केला आहे. गावाबाहेर जाणारे आणि गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती लिखित स्वरूपात ठेवण्याचे आदेश ग्राम पंचायतला दिले आहे.या गावांतील जामखेड शहराला जोडला जाणारा मार्ग मातकुळी येथे जांबवाडी मार्गे जामखेड,भुतवडा मार्गे जामखेड असे एकूण तीन रस्ते मातकुळीचे सरपंच आप्पा जरे,आष्टी पोलिस स्टेशनचे पो.काॅ.अनिल राऊत,पो.ना.एम.ए.उबाळे यांनी जेसीबीच्या साह्याने खोदून बंद केले आहेत. तसेच क-हेवडगांवमध्ये क-हेवाडी ला जाणारा मार्ग,मातकुळी,आष्टा फाटा येथे जाणारे रस्ते, चिंचपुर, शिंदे वस्ती, भातोडी या गावांतील जामखेड शहरात जाणा-या चोर वाटा बंद करण्यात आल्या आहेत.
क-हेवडगांव येथे तहसिलदार निलिमा थेऊरकर,पोलिस उपनिरीक्षक अमित करपे यांनी गुरुवारी सायंकाळी भेट देऊन ग्रामस्थांना गावातील सर्व रस्ते बंद करा,घराच्या बाहेर निघु नका,गावातील आस्थापना,दुकाने १४ दिवस पूर्णवेळ बंद करण्याच्या सुचना दुकानदार व्यावसायिकांना दिल्या. कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असा इशारसुद्धा त्यांनी दिला. यावेळी गावचे सरपंच केशव बांगर,उपसरपंच जालिंदर गायकवाड,ग्रामसेवक बी.एस.डोके,पो.ना. अनिल सुंबरे,आशा वर्कर सुवर्णा गावडे,अंगणवाडी सेविका रतन खांडवे आदी उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवा डोअर टु डोअर
आरोग्य विभाग आणि आशा वर्कर "डोअर टू डोअर' जाऊन कोरोना सुरक्षे संदर्भात माहिती आणि तपासणी करणार आहेत.क-हेवडगांव ग्रामपंचायतने अत्यावश्यक सेवा नागरिकांना पुरवण्यासाठी दहा स्वयंसेवकाची नेमणूक करुन ग्रामस्थांना किराणा सामान,औषधे,भाजीपाला याची यादी घेऊन घरोघरी सेवा पुरवण्यास सुरुवात केली असल्याचे सरपंच केशव बांगर यांनी सांगितले