- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : अंबाजोगाईत सोमवारी कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या उद्घाटकांनाच कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या समारंभासाठी उपस्थित सर्वांच आमदार, जिल्हाधिकारी, पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील सात जणांचा स्वॅब घेतला असून ६० जणांना क्वारंटाईन राहण्याचे आदेश काढले आहे. जे लोक संपर्कात आले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे काम अद्यापही सुरूच आहे.
अंबाजोगाईत कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाधिकारी, डॉक्टर्स, विविध खात्यांचे अधिकारी, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हा समारंभ झाला त्या समारंभात अधिष्ठातांसह १३ डॉक्टर्स सहभागी झाले होते. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या चार पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. याशिवाय शहरातील विविध अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार या समारंभाला उपस्थित राहिले होते. याशिवाय या समारंभप्रसंगी काढण्यात आलेल्या छायाचित्रातून उपस्थितांची नोंद घेण्याची कामगिरी आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. यातील अनेकांनी स्वत:ला डॉक्टरांशी संपर्क साधून क्वारंटाईन करून घेतले तर खुद्द आरोग्य अधिकाऱ्यांनी या उपस्थितांशी संपर्क साधून क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समारंभात जवळपास ६० जण प्रत्यक्ष संपर्कात आल्याचा संशय असल्याने त्या सर्वांना क्वारंटाईन करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यांच्याशी वारंवार संपर्क केला जात आहे.
७ जणांचे स्वॅब घेतलेपालकमंत्र्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यात काँग्रेस आमदारासह पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. इतरांचेही स्वॅब घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
ते चौघे काळजी घेऊन करणार कामकोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेत काम करणारे चार डॉक्टर्स उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. या डॉक्टरांना क्वारांटाईन करण्यात आले आहे. असे असले तरी चाचणी करताना अडथळे येऊ नयेत, यासाठी या चौघांना काळजी घेऊन काम करण्याची मुभा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते.