बीड : बीड जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त आहे. गुरुवारी जिल्ह्यातून कोरोनासंशयित असलेल्या ५५ लोकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले होते. रात्री ८.३० वाजता त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, सर्वच निगेटिव्ह आलेले आहेत. यात कोटा येथून परतलेल्या ३५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शून्य कायम आहे.
जिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत २२०, अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून ६४ व केज उपजिल्हा रुग्णालयातून पहिल्यांदाच ३ लोकांचे स्वॅब घेतले होते. ते लातूरच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. गुरुवारी दिवसभरात ५५ स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा होती. रात्री उशिरा सर्वच अहवाल निगेटिव्ह आले. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
जिल्ह्यात आढळलेला एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन पंधरवडा उलटला आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. 16 विद्यार्थ्यांचे शुक्रवारी स्वॅब घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एकूण ५१ विद्यार्थी परतले होते. पैकी ३५ जणांचा स्वॅब घेतला होता. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.