किल्लेधारूर : इस्लामपूर येथून किल्लेधारूर तालुक्यात आलेल्या ६ मजूरांसह ३२ जणांना दि.२९ मार्च शनिवारी मध्यरात्री आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन मध्ये ठेवले होते. त्यांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवून १४ दिवस आरोग्याची रोज तपासणी केल्यानंतर आज त्यांची वरीष्ठांच्या सल्ल्यानुसार सुटी होणार असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल २३ जणांना कोरोना विषाणू ची लागण झाल्याने राज्यात खळबळ माजली होती. याच इस्लामपूर मधून तालुक्यातील ऊसतोड मजूर दि.२९ शनिवारी रोजी आपल्या गावी परतण्यासाठी तालुक्यात दाखल झाले होते. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच मोठ्या शर्थीने या लोकांशी संपर्क करून सर्व लोकांना मध्यरात्री बारा वाजता किल्लेधारूर येथील सज्ज ठेवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व नागरिकांच्या गेली १४ दिवस आरोग्याची काळजी घेतली जात होती. हे सर्व ऊस तोड कामगार असून तालुक्यातील खोडस येथील एका कुटूंबातील ३ व संगम येथील एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा यात समावेश होता. या सहा उसतोड मजुरांशी संबंध आलेल्या २६ लोकांसह एकुण ३२ जनांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची सर्वांची प्रकृती ठणठणीत असुन वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आज त्यांची सुटी करणार असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.