बीड : लातूर येथे शनिवारी आठ लोक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यांनी दोन जीपमध्ये बीड जिल्ह्यातून प्रवेश केल्याने त्यांचा बीड पोलीस व शहागड आणि चौसाळा चेकपोस्टवरील पथकाशी संपर्क आला होता. अशा २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रविवारी दाखल केले होते. आज दुपारी त्यांचे अहवाल आले असून सर्वच निगेटिव्ह आहेत. कोरोनाशी लढा देणा-या कर्मचा-यांच्या प्रामाणिक कर्तव्याचा हा विजय आहे. इतर अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
आंध्रप्रदेशमधील आठ लोक ३१ मार्च रोजी रात्री दोन जीपमधून शहागड येथे आले. त्यांना चेकपोस्टवरून प्रवेश नाकारला. त्यांनी कर्तव्यावरील पथकासोबत हुज्जत घातली. तरीही प्रवेश न मिळाल्याने ते शहागडमध्येच मुक्कामी थांबले. सकाळी सात वाजता ते पुन्हा चेकपोस्टवर आले. तरीही प्रवेश नाकारला. नंतर त्यांनी नागझरीमार्गे बीडमध्ये प्रवेश केला. नंतर चौसाळा चेकपोस्टवरही त्यांची तपासणी केली. पुढे ते तुळजापूर, उमरगा मार्गे निलंगा येथे गेल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, लातूरमध्ये त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येताच बीडची यंत्रणा सतर्क झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू केले. बीडमध्ये कोठेच न थांबल्याने इतर लोकांशी संपर्क आला नाही. परंतू चेकपोस्टवर त्यांचा संपर्क आला होता. त्यामुळे शहागड व चौसाळा चेकपोस्टवर कर्तव्यावर असणारे पोलीस, आरोग्य व शिक्षक असे २९ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ९८ लोकांचा अहवाल पाठविलेला आहे. सर्वच अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अन् त्यांच्या चेह-यावर दिसले हास्यप्रशासनाने नेमून दिलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडताना न कळत कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला. आता आपल्यलााही आयसोलेट केल्याने पोलीस, आरोग्य व शिक्षक घाबरले होते. रात्रभर त्यांना अहवालाची चिंता होती. परंतु सर्वच निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांच्या चेह-यावर हास्य फुलल्याचे दिसले. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येण्यासह यापुढे जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळणार नाही, यासाठी बीडकर प्रार्थना करताना दिसत आहेत.