केज : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकार सह स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा युद्ध पातळीवर काम करत आहेत. नागरिकांनी काहीही न करता केवळ घरात बसुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र अनेक लोकांना याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातील टाकळी गावच्या सुजाण नागरिकांनी जो कोणी विनाकारण बाहेर पडेल त्याची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच विष्णू घुले यांनी दिली.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सरकार पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना बाकी काहीही न करता केवळ आणि केवळ घरात बसून राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मात्र ग्रामीण भागातील अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत.त्यांना कितीही समजून सांगितले तरी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे केज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत च्या वतीने अनोखी शक्कल लढवली आहे. जो कोणी व्यक्ती तीन वेळेस विनाकारण बाहेर पडेल त्याला ५००/- रुपये दंड करण्यात येणार आहे.तर जो दंड करूनही चौथ्या वेळेस बाहेर पडेल त्याची गाढवावरून धिंड काढण्यात येणार असल्याची दवंडी गावात देण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती बसली असून कुणीही विनाकारण बाहेर पडण्याचे धाडस करताना दिसत नसल्याची माहिती सरपंच विष्णू घुले यांनी दिली. सदरील अनोख्या युक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.