- अनिल भंडारी बीड : बाळ झालं म्हणून मला विसरलात का? बाबा.. या ना... वरती अशी गॅलरीतून हाक मारत चिमुकला राजवीर घुसमट व्यक्त करतो, तेव्हा भरुन येतं, त्याला कसं सांगावं, बाळामुळे नाही तर कोरोनामुळे दूर राहावं लागतं. इच्छा असूनही थोरल्या-धाकट्या लेकरांना भेटता येत नाही. भेटीचा मोह होतो पण मनालाच आवर घालून कर्तव्यावर जावे लागते. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई नितीन काकडे यांच्याशी लोकमतने संवाद साधला, तेव्हा गहिवरले. त्यांच्याप्रमाणेच अनेक पोलीस बांधवांची अशीच घालमेल आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांना घरापासूनही अंतर ठेवावं लागत आहे.
नितीन काकडे यांची पत्नी रेणुका या जिल्हा विशेष शाखेत पोलीस शिपाई पदावर आहेत. त्यांचा मोठा मुलगा राजवीर येत्या ५ मे रोजी पाच वर्षांचा होतोय. तर २ एप्रिल २०२० रोजी त्यांना मुलगा झाला. कुटुंबात आंनदाचे क्षण असताना केवळ कोरोना टाळण्याच्या युध्दामुळे दोघांनाही बिलगता येत नाही, अशी नितीन यांची अवस्था. शिवाजीनगर ठाणे हद्दीत पेट्रोलिंग, फिक्स पार्इंट, बॅँका तसेच वर्दळीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सच्या पालनासाठी जावे लागते. सुरक्षेसाठी मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साधनं सोबत असतात. रजेमुळे रेणुका दोन्ही लेकरांसोबत माहेरीच आहेत. सासरवाडी बीडमध्येच असल्याने डब्याची सोय झाली. सासुबाई येतात. ठराविक अंतरावर डबा ठेवतात. नंतर जावईबापू तो घेऊन जातात. तितक्यात गॅलरीतून राजवीर आवाज देतो, त्याला पाहून समाधान मानत नितीन निघून जातात. कधी कधी पत्नीशी बोलण्यासाठी वरच्या मजल्यावरुन खाली बोलावून दूर अंतरावरुनच संवाद साधावा लागतो. एरव्ही फोनवरच बोलणं, ‘काळजी घ्या, तुम्हाला मुलांना पहायचंय, गर्दीत जाऊ नका’ अशी भावनिक सूचनाही ऐकावी लागते. परंतू कोरोनाच्या परिस्थितीत अशा भावनांनाही मुरड घालावी लागते. कारण तिथे राष्ट्र कर्तव्याला प्राधान्य असते.
पित्याच्या स्पर्शाला पुत्र पारखा... कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. या कालावधीत २ एप्रिल रोजी घरात रत्न जन्माला आले. परंतू कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागत असल्याने लेकाला हातावर घेण्याची तगमग असतानाही कोरोनाने २२ दिवसांपासून पित्याचा स्पर्श रोखला आहे. आईच्या वात्सल्याचा स्पर्श मिळत असलातरी कोरोनामुळे सध्या पित्याच्या स्पर्शाला हे बाळ पारखे झाले आहे. सासरी दाराबाहेरु न सामाजिक अंतर ठेवून लेकाला पाहून पुन्हा कर्तव्यावर परतण्याचा अनुभव नितीन काकडे रोज घेत आहेत.
आधी कर्तव्य सेवेचे, मग घरचेपोलीस म्हणून नोकरी स्वीकारली. जनतेच्या सेवेसाठी काम करावे लागते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनहिताला प्राधान्य देत भावनिकतेचा त्याग करावा लागतो. प्रत्येक मोहाला आवर घालावा लागतो. परंतू जनसेवेसाठी काम करावे लागत असल्याचे समाधान वाटते, असे नितीन काकडे म्हणाले.