धारूर : येथील जिनिंग मिलवर कामाला असलेल्या मध्यप्रदेश येथील ५१ मजुरांनी आज घराकडे पायी प्रवास सुरु केला. यात एक माता आपल्या दहा दिवसाच्या नवजात बालकासह मोठ्या कष्टाने पाऊले टाकत पुढे निघाली होती. मात्र प्रसंगावधान राखून प्रशासनाच्यावतीने त्या मजूरांना अडवून येथील बसस्थानकात थांबविण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
परप्रांतियांच्या परतीच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. इतर जिल्ह्यातून अनेक रेल्वे परप्रांतियांना घेवून रवाना झाल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील परप्रांतिय अद्यापही परवानगीच्या कचाट्यातच अडकली आहेत. येथील तहसील प्रशासनाकडे यापुर्वीच सुमारे ८३ जणांनी परत जाण्यासाठी अर्ज केले आहे. मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथील ३६ जिनिंग मजूर व त्यांच्या लहान १५ बालकांनी प्रशासनाच्या या कचाट्यातून सुटका करुन पायी घराकडे जाण्याचा प्रयत्न घेतला. याबाबत पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांना माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व मजूरांना विश्वासात घेत बसस्थानकात थांबवले. यानंतर त्यांच्या चहापानाची व्यवस्था करुन बसद्वारे त्यांना राज्याच्या सिमेवर पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
या ५१ जणांमध्ये केवळ दहा दिवसाचे बाळ व मातेचासुद्धा समावेश आहे. हे मजूर येथील गुरु राघवेंद्र जिंगिग व प्रेसिंग मिलवर मजूरीसाठी आल्याची माहिती आहे. दरम्यान, अनेकांनी या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. या स्थलांतरितांमध्ये बसंती हि महिला आपल्या दहा दिवसाचा चिमुकला घेऊन जथ्थ्यात पायी चालत होती. बसस्थानकात बिस्कीते दिले असता या उपाशी मातेचे डोळे अश्रूंनी डबडबून आले.
परवानगीसाठी दप्तर दिरंगाई गेल्या काही दिवसांपासून परप्रांतिय प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईला परेशान होऊन पायी प्रवास करत असल्याचे दिसत आहे. कालच येथून कोल्हापूर येथे काम करणारे ११ मजूर पायी जात असल्याचे आढळून आले होते. तालुक्यातून तामिळनाडूच्या ४, उत्तरप्रदेशच्या १०, कर्नाटक २ तर मध्यप्रदेशच्या ६८ मजूरांनी परतीसाठी तहसील कार्यालयात अर्ज केलेली आहेत