- दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील लातूर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने रेशनकार्ड धारकास नियमाप्रमाणे स्वस्त धान्य न देता इपॉस मशीनवर नियमाप्रमाणे धान्य दिल्याची नोंद स्वतःचे आधार प्रामाणिकरण करून केली होती या प्रकरणी रेशनकार्ड धारकाने याबाबत अन्न पुरवठा मंत्री व प्रधानसचिव यांच्याकडे लेखी तक्रार होती या तक्रारीची चौकशी करून अखेरीस जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. या बाबत लोकमत मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
केज तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्ड धारकांना शासनाकडून नियमाप्रमाणे मानसी येणाऱ्या धान्याचे वितरण न करता ते कमी प्रमाणात वितरण करत असल्याचे प्रकार सर्रास पणे चालू आहेत असाच प्रकार तालुक्यातील लहुरी येथील स्वस्त धान्य दुकानदार डी टी चाळक यांनी केला त्यांच्याकडे रेशनकार्ड असलेले अशोक रामभाऊ चाळक हे स्वस्त धान्य आणण्यासाठी स्वस्तधान्य दुकानावर गेले असता त्यांना स्वस्तधान्य दुकानदाराने नियमाप्रमाणे येणारे तीस किलो गहू व वीस किलो तांदूळ देण्या ऐवजी त्यांना अठरा किलो गहू व दहा किलो तांदूळ देत बारा किलो गहू व दहा किलो तांदूळ कमी दिला मात्र दिलेल्या स्वस्त धान्याची नोंद इपॉस मशीनवर मात्र अशोक चाळक यांना तीस किलो गहू व वीस किलो तांदूळ दिल्याची नियमाप्रमाणे नोंद स्वतःचे आधार प्रमाणीकरण करून केली.
अशोक चाळक यांनी दुकानदारास नियमाप्रमाणे धान्याची मागणी करूनही धान्य न दिल्याने त्यानी याची तक्रार अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ व अन्न पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली होती त्यांनी याची गंभीर दखल घेत सदरील स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीचे आदेश दिल्या नंतर सदरील दुकानाची केज तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी तलाठी वाघमारे यांच्या मार्फत चौकशी केली असता सदर स्वस्तधान्य दुकानदार यात दोषी आढळून आला तसा अहवाल तलाठी वाघमारे यांनी दिल्या नंतर तहसीलदारानी सदर दुकानावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे पाठवला होता त्या नुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लहुरी येथील डी टी चाळक यांच्या नावे असलेल्या स्वस्तधान्य दुकानाचा परवाना निलंबित केला असल्याचे आदेश अखेर पारित केले आहेत . दरम्यान रेशनकार्ड धारकास कमी धान्य देणे अखेर स्वस्तधान्य दुकानदारास महागात पडले आहे.