बीड : अंबाजोगाई येथील वृध्दत्व व मानसिक आरोग्य रुग्णालयातील ११ परिसेविका प्रतिनियुक्तीवर इतर आरोग्य संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचे वेतन आॅक्टोबर २०१९ पासून अद्यापही झाले नसल्याचे समोर आले आहे. या परिसेविका सध्या कोरोना संशयित असलेल्या आयसोलेशन सारख्या वॉर्डमध्ये जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.
अंबाजोगाई येथे वृध्द व मानसिक आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय स्थापन केले. सुसज्ज इमारत व अधिकारी - कर्मचाºयांची नियुक्तीही केली. याच नियुक्तीमध्ये पदोन्नतीने आलेल्या शोभेकला कावळे, उषा कावळे, रंजना शेरखाने, रेगिना सूर्यवंशी, रजनी भालेराव, अनिता धांडे, द्वारका खाडे, सुनिता भट्टे, निर्मला चौधरी, वैशाली कुलकर्णी, कोंडाबाई मराठे यांचा समावेश होता. परंतु हे रुग्णालय कार्यान्वित नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय, केज उप जिल्हा रुग्णालय व लातरर आणि उस्मानाबादच्या आरोग्य संस्थेत प्रतिनियुक्ती देण्यात आली. यातील काही परिसेविका या कोरोना संशयितांसाठी स्थापन केलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये कर्तव्य बजावत आहेत. जीव धोक्यात घालून सेवा देणाºया याच परिसेविकांचे आॅक्टोबर २०१९ पासून अद्यापपर्यंत वेतन मिळालेले नाही. प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवणे व आश्वासने देऊन या परिसेविकांची बोळवण केली जात आहे. सध्या त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत त्यांनी लातूरचे आरोग्य उप संचालक डॉ. एकनाथ माले यांची भेट देऊन कैफियत मांडली. परंतु अद्यापही त्यांचे वेतन झालेले नाही. वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेने केली आहे.
वेगळा हेड असल्याने प्रक्रियेला विलंब होत आहे. लवकरच वेतन देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. याबाबत पाठपुरावा सुरुच आहे.- डॉ. एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूरवेतन नसल्याने अडचणी
महिन्यांपासून वेतन नसल्याने अनंत अडचणी आहेत. याबाबत उपसंचालकांची भेटही घेतली आहे. परंतू अद्याप वेतन मिळालेले नाही. आम्हाला वेतन देण्यासह आमची मुळ संस्थेतील अस्थापनेवर नेमणूक करावी. प्रतिनियूक्तीचे ठिकाण दुर असल्याने अडचणी आहेत. वैशाली कुलकर्णी, रेजिना सुर्यवंशी, परिवेविका