बीड : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. दरम्यान बीड शहरातील पोलीस कर्मचारी व गरजूंसाठी समाजिक कार्यकर्ते सरसावले असून, दररोज दुपारी जेवणाचे ३५० डबे पोलीस कर्मचारी व गरजू व्यक्तींना दिले जातात. तर, एका कुटुंबाकडून दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी ५ वाजता चहाची व्यवस्था केली आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप व त्यांच्या कुटुंबियांकडून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांना व गरजूंना जेवणाचे ३५० पेक्षा अधिक डबे पुरवले जातात. यासाठी जगताप यांनी नियोजन केले असून, या कामात त्यांचे कुटुंबातील सदस्य मदत करतात, तर डबे पोहचवण्याचे कामं हितेश बुद्धदेव, किशोर जगताप, विजय जगताप व आकाश जगताप हे करतात. संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था ही मेसवर आहे. मात्र, या कालवधीत खानावळी बंद असल्यामुळे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती. दरम्यान हीच गरज ओळखून अनिल जगताप यांनी तात्काळ ३५० पेक्षा जास्त जेवणाचे डबे विकत घेतले व ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यांना आग्रह करून जेऊ घालण्याचे कामं सुरु केले. संचारबंदी उठेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जाईल अशी प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली.
दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर आपण पण सामाजिक भान राखत काहीतरी केले पाहिजे या भावनेने शहरातील संध्या राजेंद्र गुगळे व नीधी राजेंद्र गुगळे या माय-लेकी दररोज ५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान, बीड शहरातील पोलीस मुख्यालय तसेच गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी व चौका-चौकात बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांची जागेवर चहाची व्यवस्था केली.
ही संकल्पना त्यांचे पती राजेंद्र गुगळे यांची होती. मात्र, हे कामं करताना पोलीस प्रशासनाच्या कामाचा आम्हाला अंदाज होत आहे. कारण पोलीस हे जनतेचे संरक्षण करत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या सुचनांचे पालन करून घरी बसले पाहिजे व नियमांचे पालन केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. दरम्यान इतर जिल्ह्यातून आलेल्या निराधारांना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संघना पुढे सरसावत आहेत.