- पुरुषोत्तम करवामाजलगाव : चार दिवसावर येऊन ठेपलेल्या अक्षय तृतीयाला आंब्याचे अनन्यसाधारण महत्व असले तरी, यावर्षी कोरोनाच्या धर्तीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारातून आंबा गायब झाला आहे. खेड्यापाड्यातुन येणारा गावरान व इतर राज्यातुन येणारा आंबाही संचारबंदीत अडकल्याने यंदाची अक्षय तृतीया पुरणपोळीवरच साजरी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हिंदू धर्मात साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक आगळेवेगळे महत्व असते. गुढीपाडव्याला हिंदू वर्षाची सुरुवात झाल्यानंतर येणारा अक्षय तृतीय हा पहिलाच सन असून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोन्यासह अन्य वस्तूंची मोठी खरेदी यादिवशी नागरिकांकडून करण्यात येते. नवीन वाहन खरेदी, नवीन वास्तूत गृह प्रवेश यादिवशी शुभ मानले जाते. याचदिवशी दिवंगत आई, वडिलांना नैवद्य देऊन पित्र, सुवासानीला आमरस, पुरणपोळीचे जेवण करण्यात येते. अक्षय तृतीयाला आंब्याचे अनन्यसाधारण महत्व असल्याने नागरिकांकडून यादिवशी आंब्याची मोठी खरेदी करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मालवाहातुकीसह सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद आहेत.
यामुळे कर्नाटक , आंध्रप्रदेश , पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून होणारी आंब्याची आवक ठप्प झाल्याने बाजारात आंबा दिसेनासा झाला आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने तालुक्यात एकदिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या केवळ अडीच तासातच शिथिलता ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने रस्त्यावर, बाजारात बसून फळविक्रीला बंदी घातल्याने यावर्षी आंबा खरेदी करणे दुरापस्त झाले आहे. यामुळे अक्षय तृतीयाला आंब्याचे महत्व असले तरी, कोरोनामुळे यावर्षीची अक्षय तृतीय आंब्याविनाच साजरी करण्याची मानसिकता नागरिकांनी ठेवली आहे.