बीड : जिल्ह्यात सध्या सर्वत्र सीमा बंदी आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यास व येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. यासाठी जिल्ह्यात १४ ठिकाणी चेकपोस्ट केल्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यात प्रवेश करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आता प्रत्येक चेकपोस्टवर एका नायब तहसीलदारची नियूक्ती केली आहे. २४ तास ते आपल्या पथकासोबत खडा पहारा देणार आहेत.
बीड जिल्ह्यात चौसाळा, पांढरवाडी फाटा, अंभोरा, महार टाकळी - शेवगाव, शहागड पुल, सोनपेठ फाटा, गंगाखेड रोड, गंगामसला, सादोळा, बर्दापुर फाटा, बोरगाव पिंपरी, मालेगाव, मातोरी पाथर्डी, मानूर चिंचपूर फाटा अशी १४ चेक पोस्ट तयार करण्यात आली आहेत. साधारण २० मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढत जिल्ह्यात येण्यासह बाहेर जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती. प्रत्येक ठिकाणी आरोग्य, शिक्षण व पोलीस विभागाचे कर्मचारी नियूक्त केले होते. परंतु तरीही नागरिकांचे प्रवेश सुरू असल्याचे वारंवार जाणवत असल्याने याठिकाणी आता नायब तहसीलदारांना प्रमुख करण्यात आले आहे. प्रत्येक पोस्टवर तिघांची नियूक्ती केली असून आठ आठ तास कर्तव्य बजावणार आहेत. जिल्ह्यात ४२ नायब तहसीलदारांच्या नियूक्त्या केल्या असून तसे आदेशही शनिवारीच रेखावार यांनी काढले आहेत.
अनाधिकृत नव्हे अधिकृत प्रवेश?जिल्ह्यात येण्यास बंदी असतानाही लोक सर्रासपणे प्रवेश करीत असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. विशेष म्हणजे प्रवेश चेकपोस्टवरूनच झाल्याचे सांगण्यात येत आहे. छुप्या मार्गांची नोंदच होत नाही. त्यामुळे हे सर्व प्रवेश अधिकृतपणे होत असून चेकपोस्टवरील यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
चेकपोस्ट तत्पर करण्याची गरजसध्या बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. सुदैवाने अद्यापही बीड जिल्ह्यात रुग्ण आढळला नाही. परंतु आढळू नये, यासाठी आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. सीमा बंदी १०० टक्के बंद करण्याची गरज आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच खात्री करून सुरू ठेवणे आवश्यक आहे. यासाठी चेकपोस्टवरील बंदोबस्त अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.