बीड : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातील सहभागी लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातीलही लोक सहभागी झाले होते. बीडचेही लोक सहभागी झाल्याचा संशय होता. परंतु मागील महिनाभरात केवळ एक व्यक्ती दिल्लीहून बीडला आला असून त्याचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दिल्ली येथील संमेलनात देश-विदेशातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. महाराष्ट्रातीलही लोकांची नावे समोर आली होती. त्यातच बीडचे काही लोक असल्याचे समोर आल्याने बीडकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी अधिकृत पाच लोकांची यादी आरोग्य विभागाला देत खात्री करण्यास सांगितले. पैकी चौघे हे बीड जिल्ह्यातील नसल्याचे सांगण्यात आले. तर एक व्यक्ती हा १२ मार्चला दिल्ली येथे गेला होता. परंतु तो त्या धार्मिक कार्यक्रमात न जाता मंत्रालयात कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाशी संबंधित एकही व्यक्ती बीडमध्ये आतापर्यंत आढळला नसल्याचे पोलीस, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सापडलेल्या एकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले असून स्वॅबही तपासणीस पाठविला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नयेपोलिसांकडून पाच लोकांची यादी आली होती. खात्री केली असता चार लोक हे बीडचे नसून एक व्यक्ती हा दिल्लीत गेला होता, परंतु कार्यक्रमात हजेरी न लावता मंत्रालयात कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. संशय म्हणून त्यालाही आयसोलेशनमध्ये दाखल केले असून स्वॅब तपासणीला पाठविला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काळजी घ्यावी. - डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड