परळी वैजनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी दवाखान्यांनी सर्वच रूग्णांची तपासणी बंद केली आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे तर सरकारी रूग्णालयांवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे सर्वच खाजगी रूग्णालयांनी बाह्य रुग्णांची तपासणी चालू ठेवुन रूग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन आणि परळी मेडिकल असोसिएशन यांना परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे यांनी केले आहे.
यासंबंधी दोन्ही असोसिएशनला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने सर्व खासगी रुग्णालयांना कोरोना आजाराच्या बाबतीत काळजी घेण्यासाठी ओपीडी चालू ठेवण्यासाठी आदेशित केले आहे. तरीही शहरातील खासगी रुग्णालयांच्या ओपीडी बंद आहेत. सध्या कोरोनामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. त्यांना योग्य तो उपचार व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी त्यांची ओपीडी २४ तास चालू ठेवावी असे आवाहन डॉ. लटपटे यांनी केले आहे.
दोन्ही असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रूग्णालयाच्या ओपीडी २४ तास चालू ठेवुन रूग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबत सूचना कराव्यात असेही आवाहन डॉ. लटपटे यांनी केले आहे.