अंबाजोगाई : सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने घराच्या बाहेरही निघणे मुश्किल आहे. अशा वेळी जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावत असतांना रविवार पेठेतील युवकांनी शहरातील जनावरांच्या चारा व पाण्याची सोय उपलब्ध करून देऊन भटक्या जनावरांची मोठी सोय केली आहे..
येथील कै. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्ट व कै. विश्वजित राजाभाऊ वांजरखेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघण्यास कोणीही धजावत नाही. मात्र, शहरात शेकडो गाई, वासरे चारा व पाण्याविना भटकत आहेत. या भटकणाऱ्या जनावरांच्या चारा व पाण्याची सोय प्रतिष्ठानने केली.
प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रविण शेलमुकर, सचिन भातलवंडे,पराग तांबोळी, पुरुषोत्तम शर्मा, राजेंद्र पाथरकर, अभिजित शेलमुकर, सारंग भातलवंडे, निखिल वांजरखेडकर, प्रद्मुम्न हजारे, राहुल भातलवंडे, या युवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी जाऊन जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून दिला जात आहे. जिकडे कोणाचेही लक्ष नाही. अशा उपेक्षित जनावरांसाठीच रविवारपेठेतील या युवकांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.